महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे स्थान महात्म्य मुद्गल आदि पुराणात दिलेले आहे. सुखकर्ता व दुख:हर्ता अशा गणेशाची आठ जागृत शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. प्रत्येकाने एकदातरी या अष्टविनायकांचे दर्शन अवश्य घ्यावे.`स्वस्तिश्री गणनायकं ' या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त  पद्धतीने अष्टविनायक यात्रा  करावयाची असल्यास सर्वप्रथम मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घ्यावे.त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर व रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतल्यावर पुन्हा मोरेश्वराच्या दर्शनाला मोरगावला यायचं आणि यात्रेची समाप्ती करायची, पण अशी शास्त्रोक्त यात्रा एकमार्गी नसल्यामुळे आम्ही गणेशभक्तांसाठी पुण्याहून आणि मुंबईहून अष्टविनायक यात्रा कशी करावी याची सविस्तर माहीती पुढे दिली आहे. या माहितीचा अवश्य उपयोग करावा.

 

श्री मयुरेश्वर - श्री मोरेश्वर ( मोरगाव )

भुस्वानंदभुवन म्हणून ओळखले जाणारे हे श्री क्षेत्र मोरेगाव गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून ओळखले जाते.

मोरासारखा आकार असलेले हे श्री क्षेत्र मोरगाव पुरंदर तालुक्यात क-हा नदीच्या काठावर आहे.

मोरावर बसून सिधुरासूर दैत्याचा नाश करणा-या ह्या मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. गाभा-यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मुर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस सिद्धिबुद्धिच्या पितळी मुर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

महाद्वारासमोर काळ्या पाषाणाचा गणपतीसमोर तोंड करुन बसलेला नंदी हे या देवळाचे वैशिष्ठय़ आहे. प्रसिद्ध साधू मोरया गोसावीचे मोरगाव हे जन्मस्थान. त्यांची पालखी भाद्रपद शुद्ध चतुर्थीस व माघ शुद्ध चतुर्थीस  चिंचवडहून मोरगावला येते.

पुण्यापासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे कि. मी. वर आहे.

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून मोरगावसाठी एस.टी. गाडय़ा सुटतात.

पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि . मी. आहे.

श्री चिंतामणी (थेऊर)

ब्रह्मदेवाचे चित्त स्थिर करणारे हे श्री क्षेत्र स्थावर अथवा थेऊर पुणे जिल्हात हवेली तालुक्यात पुण्यापासून २५ कि.मी. वर आहे.        

अत्याचारी राजा गणासुराला मारल्यावर कपिलमुनींनी अर्पण केलेले चिंतामणी रत्न विनायकाने आपल्या गळ्यात धारण केले. आणि तो चिंता हरणारा चिंतामणी विनायक या नावाने प्रसिद्ध झाला. श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे.

गणेशभक्त माधवराव पेशवे याचे देहावसान येथेच झाले. त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्याबरोबर सती गेल्या. त्यांचे वृंदावन मुळा-मुठेच्या काठावर आहे. चिंचवडचे श्री. मोरया गोसावी यांनी थेऊरच्याच अरण्यात उग्र तपश्चर्या करून सिद्धि प्राप्त करून घेतल्या. 

मुळा-मुठा नदींनी वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून १  कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त ५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याच्या सारसबाग किंवा पूलगेट बस स्थानकावरून थेऊरला जाण्यासाठी पी.एम.टी. च्या गाडय़ा सुटतात.

श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक)

श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती. श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फुट रुंद आहे. मुर्ती उत्तराभिमुखी असून गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सुर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. 

१सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.

दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४ कि.मी. लांबच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.

पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)

श्री महागणपती (रांजणगाव)

महागणपती म्हणजे शक्तियुक्त गणपती. ह्या महागणपतीचे ध्यान करून भगावन शिवशंकरांनी त्रिपुरासुरावर विजय मिळवला. हे विनायक स्थान पुणे जिल्हात शिरुर तालुक्यात रांजणगाव या ठिकाणी आहे. प्राचीन काळी यास मणिपूर असे नाव होते.

रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असुन मंदिरात दिशासाधन केले आहे.त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यानकाळी गणेशाच्या मूर्तीवर किरण पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मुर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धी सिद्धी उभ्या आहेत. 

पुणे-नगर महामार्गावर पुणे-कोरेगाव शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरुरच्या अलिकडे २१ कि.मी. अंतरावर आणि पुण्यापासून ५० कि.मी. वर आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकाहून रांजणगावसाठी सतत एस.टी. बसेस आहेत.

श्री विघ्नेश्वर (ओझर)

विघ्नासुराचा नाश करणा-या विघ्नेश्वर विनायकाचे स्थान पुणे जिल्हात जुन्नर तालुक्यात नारायणगावापासून कि.मी. अंतरावर ओझर  या गावी आहे.

श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारही बाजूंना संरक्षणार्थ दगडी तट आहे. या तटबंदीवरुन लेण्याद्री दिसतो आणि किल्ले शिवनेरीही नजरेत येतो.

श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, पूर्णाकृती व आसान मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकीत हिरा व बेंबीत खडा बसविला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस ऋद्धी सिद्धच्या मूर्ती आहेत. 

पुण्यापासून चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगावमार्गे ओझर ८५ कि.मी. वर आहे.

मुंबईहून ठाणे-कल्याण-बापसई-सरळगाव ओतूरमार्गे ओझर १८२ कि.मी.वर आहे.

जुन्नर अथवा नारायणगावला जाण्यास पुणे येथील शिवाजीनगर स्थानकावर गाडय़ा मिळतात.

श्री गिरिजात्मज (लेण्याद्री)

अष्टविनायक क्षेत्रांपैकी डोंगरावर असलेंले आणि बौद्ध लेण्यांच्या सान्निध्यातील एखमेव क्षेत्र म्हणजे लेण्याद्री आणि इथला विनायक म्हणजे पार्वतीचा (गिरिजेचा) मुलगा गिरिजात्मज विनायक. लेण्याद्री पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर-पश्चिम तीरावर आहे.

हे मंदिर डोंगरात खोदलेले विस्तीर्ण लेणेच आहे. पायथ्यापासून ३०७ पाय-यावर चढून गेले की मंदिर लागते. या देंवळाचे वैशिष्टय़ असे की, संपूर्ण मंदिर एकाच दगडात कोरलेले आहे. येथे गणेशाची स्वतंत्र, आखीव-रेखीव मूर्ती नाही. या लेण्यात कोणीतरी दगडी भिंतीवर गणेशाची मूर्ती खोदलेली आहे. मूर्ती उत्तराभिमुख आहे. येथे कोणालाही स्वहस्ते श्रीची पूजा करता येते.

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगावहून जुन्नरमार्गे लेण्याद्री हे पुण्यापासून ९४ कि.मी. वर आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकापासून जुन्नरकरिता गाडय़ा सुटतात.

जुन्नर ते लेण्याद्री साधारणपणे ५ कि.मी. आहे. लेण्याद्रीस जाण्याकरिता टांगा किंवा रिक्षा आहेत.

श्री वरदविनायक (महड)

गृत्समद ऋषींना वरदान देणा-या वरदविनायकाचे स्थान रायगड जिह्यात खालापूर तालुक्यात महड या गावी आहे.

मंदिर पूर्वाभिमुख आहे. पश्चिमेला देवाचे तळे आहे. गाभाऱयात दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर श्री वरदविनायकाची मूर्ती आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून बैठी व पूर्वाभिमुख आहे. 

मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे ६ कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुबई-महड अंतर ८३ कि.मी आहे.

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे.

कर्जत ते महड फाटा एस.टी. बसेस आहेत. महड फाटय़ापासून देवस्थान दीड कि.मी. आहे. पायी जाण्यास सोपे.